Skip to content

छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध | Rajarshi Shahu Maharaj Bhashan

राजर्षी शाहू महाराज

कोल्हापूर संस्थानाचे लोकराजे, आरक्षणाचे जनक, दिनदुबळ्यांचे कैवारी, कुशल प्रशासक, राधानगरी धरणाचे निर्माते, थोर समाज सुधारक, शिक्षण प्रेमी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे होते. तर आईचे नाव राधाबाई होते.

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यास दत्तक घेऊन त्यांचे नाव राजर्षी शाहू महाराज ठेवण्यात आले. शाहू महाराजांचे शिक्षण 1885 ते 1889 या कालावधीमध्ये राजकोट येथे झाले.

शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूर संस्थानात गावोगावी शाळा सुरू करण्यात आल्या. शाळेमध्ये पगारी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांच्यावर दंडाची कारवाई सुरू केली. शाहू महाराजांच्या या कार्यामुळे खेड्यापाड्यातील सामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोहोचले.

कोल्हापूर संस्थानातील सामान्य लोकांना शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक क्षेत्रावर महाराज दरवर्षी एक लाख रुपये खर्च करत होते. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे सांगितलेले महत्त्व प्रत्यक्षात अंमलबजावणीचे काम शाहू महाराजांनी केले.

प्राथमिक शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण ही विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये वसती गृह स्थापन केली. निरनिराळ्या जाती धर्मातील मुलांना एकाच वसतीगृहात राहताना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून शाहू महाराजांनी प्रत्येक जाती धर्माच्या विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वसती गृह उभारले. यामध्ये राजाराम वसतीगृह , मराठा बोर्डिंग, वीर शेव लिंगायत बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, मिस क्लार्क बोर्डिंग, नामदेव बोर्डिंग इत्यादी वसतिगृहांचा समावेश होतो. आशा प्रकरे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचे काम शाहू महाराजांनी केले होते.

ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा होते अशा विद्यार्थ्यांकरिता त्यांनी शिष्यवृत्तीची योजना राबवली. अशाच प्रकारची शिष्यवृत्तीची संधी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले उच्च शिक्षण परदेशात जाऊन पूर्ण करण्यासाठी आवश्यक आर्थिक साह्य बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांनी केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याप्रमाणे शूद्र मानून त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला तशाच प्रकारचा त्रास शाहू महाराजांना सुद्धा झाला होता. शाहू महाराजांच्या बाबतीत वेदोक्त प्रकरण घडले होते. शाहू महाराजांच्या पूजा अर्जेच्या वेळी वेदोक्त मंत्रा न म्हणता त्यांच्या ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असत. कारण ब्राह्मणांच्या मते छत्रपती राजश्री शाहू महाराज हे क्षेत्रीय नसून शूद्र असल्याकारणाने त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्र मानता येणार नाही.

शाहू महाराजांच्या बाबतीत राजे असूनही असा प्रसंग घडत असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत खूप वेगळी परिस्थिती असावी असे शाहू महाराजांना वाटले. म्हणून कोल्हापुरात घडलेल्या वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी बहुजन समाजातील पुरोहित तयार करण्याचा निर्णय घेतला. धार्मिक विधीचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना केली. पूर्वी सर्व विधी करण्यासाठी ब्राह्मणांची आवश्यकता होती, शाहू महाराजांचा या निर्णयानंतर त्यांना न बोलवता ही धार्मिक विधी पार पाडले जाऊ लागले. आशा प्रकारे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे कार्य शाहू महाराजांनी पुढे चालू ठेवले. सर्वसामान्य जनतेवरील अन्याय दूर केले.

समाजा समाजामध्ये जातीभेदाच्या भिंती पाडण्यासाठी शाहू महाराजांनी निरनिराळे प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराज स्वतः कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानत नव्हते. अशाप्रकारे कोल्हापूर संस्थानात शिक्षण, सामाजिक प्रबोधन, सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा राजा, पुरोगामी विचार जोपासणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठे स्थान आहे. अशा या महामानवाने ६ मे १९२२ ला या जगाचा निरोप घेतला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम.

1 thought on “छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध | Rajarshi Shahu Maharaj Bhashan”

  1. Pingback: छत्रपती राजश्री शाहू महाराज स्वाध्याय 5 वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *