Skip to content

पाण्याची गोष्ट स्वाध्याय इयत्ता पाचवी | Panyachi gosht swadhay

पाण्याची गोष्ट स्वाध्याय

पाण्याची गोष्ट हा पाठ पाण्याचे महत्व पटवून देणारा, पाणी बचत करण्याचा संदेश देणारा पाठ आहे. हा पाठ तीन भागांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये मुले शाळेला जाताना चे वर्णन आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पोहोचण्यासाठी पाण्यामुळे येणाऱ्या समस्या यांचे वर्णन आहे.

पाण्याची गोष्ट पाठाचा हा भाग संवाद रूपाने मांडलेला आहे. या भागातून आपल्याला या मुलांच्या घरी आठवड्यातून एकदाच त्यांनी वेगवेगळ्या वारा दिवशी पाणी येते याची माहिती मिळते.

पाण्याची गोष्ट या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये विद्यार्थी दुपारच्या सुट्टीमध्ये पाण्याचे महत्व सांगणारे काही परिच्छेद वाचन करतात. चिकटवही मध्ये चिकटवलेले हे परिच्छेद विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व, पाण्याची बचत याबाबत माहिती देतात. वाढत्या बोरवेल ची संख्या, विहिरी, औद्यागिकिकरण, इलेक्ट्रिक मोटारी मुळे सतत होणारा पाण्याचा उपसा, पाण्याचे प्रदूषण, पाण्याचा गैरवापर या सर्वांमुळे पाण्याची समस्या भीषण होताना दिसत आहे.

हे पाण्याची समस्या कमी करण्यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, पाण्याची बचत करणे पावसाचे पाणी अडवणे, पाण्याचा वापर काटकसरीने करणे या प्रकारचा संदेश या दुसऱ्या भागातून दिला आहे.

पाण्याची गोष्ट या पाठाच्या तिसऱ्या भागांमध्ये विद्यार्थ्यांमधील वर्गात होणारी चर्चा आणि पर्यावरणाचे महत्त्व याबाबत माहिती दिली आहे. पाण्याच्या बचतीमध्ये सर्वांचा प्रत्यक्ष सहभाग खूप महत्त्वाचा आहे याबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आली आहे.

पाण्याची गोष्ट स्वाध्याय

इयत्ता – पाचवी

विषय – मराठी.

प्र १)  पाण्याची गोष्ट पाठव आधारित खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा.

१) रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता ?

रत्नाला शाळेत घेऊन जाण्यासाठी मुले तिच्या दारात आली. तो दिवस मंगळवार होता. मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असे. ते भरण्यासाठी तिला घरी थांबावे लागणार होते; म्हणून तिला शाळेत जायला उशीर होणार होता.

२) या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते ?

रत्नाकडे व दीपकदादाकडे आणि सकीनाकडे मंगळवारी पाणी येते. रवीकडे व कौशाकडे रविवारी, तर मोहनकडे सोमवारी पाणी येते. संवादाच्या आधारे आपल्या लक्षात येते की या मुलांच्या घरी पाणी आठवड्यात एकदाच येते.

३) कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात ?

कौशाकडे शनिवार रात्रीच हंडे, कळश्या वगैरे पाणी साठवण्याची भांडी नळासमोर रांगेत ठेवावी लागतात. सकाळपासून नळाजवळ थांबावे लागते. नळ फुसफुसायला लागला की सगळ्यांची धावपळ सुरू होते.

४) पाऊस कमी पडल्यामुळे काय होते ?

पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणे कठीण होते. अन्नधान्य, गुरांचा चारा, वीज याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात. गावोगावी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

५) जमिनीला ‘ पाण्याची बँक ‘ असे का म्हटले आहे?

पावसाचे पाणी जमिनीत मुरते व साठून राहते. ते पाणी आपल्याला कोरड्या दुष्काळात, उन्हाळ्यात उपसता येते.  बँकेत जसे पैसे साठवून बचत केली जाते व आवश्यकतेप्रमाणे आपण बँकेत ठेवलेले पैसे काढून वापरू शकतो, त्याप्रमाणे जमिनीत मुरलेले पाणी ही एक प्रकारची बचतच आहे. म्हणून  जमिनीला ‘ पाण्याची बँक ‘ असे म्हटले आहे.

            शिष्यवृत्ती परीक्षा 2024

प्र २) पाण्यासंबंधीच्या पुढील शब्दसमूहांचे अर्थ जाणून घ्या ते वापरून वाक्य बनवा.

१) पाणी जोखणे –  अर्थ : अंदाज घेणे.

वाक्य – आपला विद्यार्थी किती खरे बोलतोय की खोटे बोलतोय याचे वर्गशिक्षकांनी पाणी जोखले.

२) पाणी पाजणे – अर्थ : पराभव करणे.

वाक्य -भारतीय सैन्याने कारगिलच्या लढाईत शत्रूपक्षाला पाणी पाजले.

३) डोळ्यांत पाणी आणणे – अर्थ : रडवेले होणे.

वाक्य – डोळ्यांत पाणी आणून पार्वतीबाईंनी मुलीला  सासरी धाडले.

४) तोंडचे पाणी पळणे – अर्थ : घाबरून जाणे.

वाक्य – भूकंपामुळे गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

५) पाणी पडणे – अर्थ : वाया जाणे.

वाक्य : अवेळी पडलेल्या पावसामुळे आंब्याच्या मोहरावर पाणी पडले.

६) पालथ्या घड्यावर पाणी – अर्थ : समजावूनही तीच चूक पुन्हा करणे.

वाक्य – दिवसभर उन्हात खेळू नकोस, असे आईने राजूला बजावले, तरी राजूचे वागणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी.

प्र ३) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.

१) उठतो, बसतो, हसतो, पळतो, मुलगा.

गटात न बसणारा शब्द –  मुलगा

‘ मुलगा ‘ हे एकच नाम या शब्दसमूहात आहे. बाकी सर्व क्रियापदे आहेत.

२) तो, तुला, मुलीला, त्याने, आम्ही.

गटात न बसणारा शब्द –  मुलीला

‘ मुलीला ‘ हे एकच नाम शब्द समूहात आहे. बाकी सर्व सर्वनामे आहेत.

३) सुंदर, फूल,टवटवीत, कोमेजलेले, हिरवेगार.

गटात न बसणारा शब्द  – फूल

‘ फूल ‘ हे एकच नाम शब्दसमूहात आहे. बाकी सर्व विशेषणे आहेत.

४) रत्नागिरी, जिल्हा, पुणे, चंद्रपूर, बीड.

गटात न बसणारा शब्द – जिल्हा

‘ जिल्हा ‘ हे एकच सामान्यनाम या शब्दसमूहात आहे. बाकी सर्व जिल्ह्यांची विशेषनामे आहेत.

५) पालापाचोळा, सगेसोयरे, दिवसरात्र, दगडधोंडे.

गटात न बसणारा शब्द – दिवसरात्र

‘ दिवसरात्र ‘ हा जोडशब्द विरुद्ध शब्द एकत्र येऊन बनला आहे. बाकीच्या जोडशब्दांमधील दोन शब्द समान अर्थांचे आहेत.

६) सौंदर्य, शांतता, शहाणपणा, गोड, श्रीमंती.

गटात न बसणारा शब्द –  गोड

 या शब्दसमूहातील ‘ गोड ‘ हा शब्द गुणविशेषण आहे. बाकी सर्व शब्द भाववाचक नामे आहेत.

७) नद्या, झाड, फुले, पाने, फळे.

गटात न बसणारा शब्द –  झाड

या शब्दसमूहातील ‘ झाड ‘ हा शब्द एकवचनी आहे. बाकी सर्व शब्द अनेक वचन आहेत.

८) इमारत, वाडा, खोली, खिडकी, बाग.

गटात न बसणारा शब्द – वाडा

या शब्दसमूहातील ‘ वाडा ‘ हा शब्द पुल्लिंगी आहे. बाकी सर्व शब्द स्त्रीलिंगी आहेत.

९) खाल्ला, खेळते, लिहिले, वाचले, पाहिले.

गटात न बसणारा शब्द – खेळते

‘ खेळते ‘  हे एकच क्रियापद वर्तमानकाळी आहे. सर्व क्रियापदे भूतकाळी आहेत.

१०) जाईल, येईल, बोलेल, आला, लिहीन.

गटात न बसणारा शब्द – आला

‘ आला ‘ हे एकच क्रियापद भूतकाळी आहे. बाकी सर्व क्रियापदे भविष्यकाळी आहेत.

११) प्रसिद्ध, प्रतिबिंब, अवकळा, दुकानदार, गैरसमज.

गटात न बसणारा शब्द –  दुकानदार

 ‘ दुकानदार ‘ हा एकच शब्द प्रत्ययघटित आहे.

 बाकी सर्व शब्द उपसर्गघटित आहेत.

अति तिथे माती या पाठावर आधारित स्वाध्याय.

1 thought on “पाण्याची गोष्ट स्वाध्याय इयत्ता पाचवी | Panyachi gosht swadhay”

  1. It’s nice for students,but they also need to search answers from chapters.Some students are still dull so they need this.Thank you for letting students good in studies.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *