Skip to content

प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय इयत्ता 4 थी

  • by

प्रतापगडावरील पराक्रम या पाठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये झालेल्या भेटी दरम्यान घडलेल्या घटनांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना प्रतापगडावरील पराक्रम या प्रसंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय

प्रतापगडाविषयी माहिती

प्रतापगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला 1656 मध्ये शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आला. या किल्ल्याच्या बांधकामाची देखरेख मोरोपंत त्र्यंबक पिंगळे या मंत्र्याकडे होती. महाराष्ट्रातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणापासून हा किल्ला 24 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

किल्ल्याच्या महादरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यावर भवानी मातेच मंदिर आहे . किल्ल्यावर महादरवाजा बरोबरच दिंडी दरवाजा आहे. रेडका बुरुज, यशवंत बुरुज व सूर्य बुरुज हे बुरुज किल्ल्यांवर पाहावयास मिळतात.

प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यामध्ये भेटीचे नियोजन झाले होते. अफजलखान कपटी असल्याने शिवाजी महाराजांनी त्याच्या भेटीस जाताना सर्व आवश्यक काळजी घेतली होती. भेटीच्या दरम्यान अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मिठीमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीपासूनच सावध असल्याने त्यांनी अंगात चिलखत घातली होती व आपल्या बोटांमध्ये वाघ नख्या घातल्या होत्या.

अफजलखानाचा कपटीपणा लक्षात येताच शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनख्या अफजल खानाच्या पोटात घातल्या. हा प्रसंग इतका अचानक घडला की अफजल खानाला काही समजले नाही इतक्या वेळात शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. सोबत असलेले अंगरक्षक एकमेकावर तुटून पडले.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे लपून बसलेले सैन्य अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडले. अफजल खान धारातीर्थी पडल्याचे ऐकून सर्व सैन्य सैरावैरा धावू लागले. शिवाजी महाराजांच्या सैन्याने अफजलखानाच्या सैन्याचा धुवा उडवला. या प्रसंगालाच प्रतापगडावरील पराक्रम या नावाने ओळखले जाते.

अफजलखानाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची योग्य प्रकारे अंत्यविधी करून त्या ठिकाणी कबर उभी केली. त्या कबरीला दर्गा शरीफ असे नाव आहे.

प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय

१. दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा.

अ ) ता ग प्र ड प – प्रतापगड

आ ) व रा य शि – शिवराय

इ ) खा अ ज न ल फ – अफजलखान

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) अफजलखानाने कोणता विडा उचलला ?

अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला.

आ ) प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला ?

प्रेमापणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना निरोप पाठवला, ‘तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हांला मी आदिलशहाकडून सरदारकी देववितो.’

३. प्रतापगडावरील पराक्रम या पाठाच्या आधारे दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले ?

शिवराय त्यावेळी राजगडावर होते. त्यांना अफजलखान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले, हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाही त्यांनी विचार केला – खान कपटी, त्याची फौज मोठी. आपले राज्य लहान, उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही ! म्हणून त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे, असे शिवरायांनी ठरवले.

आ ) अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले ?

अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले, ” गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजी राजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा.

४. कारणे लिहा.

अ ) शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला.

शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला कारण त्याला माहीत होते, प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता.

आ ) विजापुरात हाहाकार उडाला.

शिवरायांनी अफजल खानाला ठार केले. तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजलखानाचा मुलगा फाजलखान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली ही बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.

प्रतापगडावरील पराक्रम या पाठावर आधारित काही प्रश्नांची नमुना उत्तरे या ठिकाणी देण्यात आली आहेत. याशिवाय काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *