संतांची कामगिरी स्वाध्याय इयत्ता 4 थी | Santanchi Kamgiri

संतांची कामगिरी : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी लोकांना दया, समता, बंधुता व न्याय इत्यादी गुणांची शिकवण दिली. इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील संतांची कामगिरी या पाठावर आधारित स्वाध्याय पाहण्या अगोदर या पाठातील काही संतांची माहिती पाहूयात.

महाराष्ट्र मध्ये श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादी संतांनी समाज जागृतीचे काम केले. यातील काही संतांविषयीची माहिती पाहूया.

श्री चक्रधर स्वामी

संतांची कामगिरी

श्रीचक्रधर स्वामी यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. त्यांचा जन्म इसवी सन 1194 मध्ये झाला. श्री चक्रधर स्वामी हे मूळ गुजरात मधील एक राजपुत्र होते. वैराग्य वृती धारण करून ते महाराष्ट्रात आले. त्यांचे जन्म नाव हरिपाळ देव असे होते.

श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली शिकवण आणि स्वामींच्या आठवणीचा संग्रह म्हणजेच लीळाचरित्र हा ग्रंथ होय. लीळाचरित्रात एकूण एकांक, पूर्वार्ध व उत्तरार्ध असे तीन विभाग आहेत. एकांक विभागात 74, पूर्वार्धात 358 व उत्तरार्धात 488 अशा साधारणपणे 950 लीळांचा समावेश लीळाचरित्र या ग्रंथात आहेत. स्त्री पुरुष, जातीपाती हे भेदभाव त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या अनेक स्त्रियाही अनुयायी होत्या.

संत नामदेव

संतांची कामगिरी या पाठातील दुसरे संत आहेत संत नामदेव. संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला. संत नामदेव हे नरसी गावचे राहणारे. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेठी व आईचे नाव गोणाई होते. त्यांचे पूर्ण नाव नामदेव दामा रेळेकर असे होते. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. महाराष्ट्र बरोबरच ते पंजाबमध्ये सुद्धा गेले व तेथील लोकांना त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांनी हिंदी भाषेत काही पदे लिहिली त्यांचा समावेश आज ही शीख लोकांच्या गुरुग्रंथसाहिब या ग्रंथात आहे.

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे आहे. त्यांचा जन्म आपेगाव पैठण येथे 22 ऑगस्ट 1275 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते निवृत्तीनाथ हे त्यांचे थोरले बंधू व सोपान देव व मुक्ताबाई ही धाकटी भावंड होती. आप्पेगाव हे गाव छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण जवळील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले एक गाव आहे.

त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेले होते. सर्वसामान्य लोकांमध्ये बोलण्याची व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती त्यामुळे त्यांना या संस्कृत ज्ञानाचा उपयोग होत नव्हता. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ मराठीतून लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भाडार त्यांनी लोकांसाठी खुले केले. दोन डिसेंबर 1296 ला तरुण वयात त्यांनी पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.

संत एकनाथ

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक महत्वाचे संत होते. त्यांचा जन्म पैठण येथे 1533 मध्ये झाला. त्यांचे हे वडिलांचे नाव सूर्यनारायण व आईचे नाव रुक्मिणी होते. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली.

भक्तिमार्गाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. त्यांनी कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा लोकांना उपदेश केला. प्राणीमात्रावर दया करा अशी शिकवण त्यांनी दिली. स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली.

संत तुकाराम

संतांची कामगिरी या पाठातील पुढील संत आहेत संत तुकाराम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम हे संत होऊन गेले. तुकारामांचे गाव देहू होय. संत तुकारामांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्हबा आंबिले असे होते. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1608 मध्ये देहू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले होते व आईचे नाव कणकाबाई होते.

संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदीत बुडवली आणि अनेक लोकांना कर्जमुक्त केले. आपल्या अभंगाद्वारे त्यांनी अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली. लोकांना त्यांनी दया, क्षमा व शांती यांची शिकवण दिली. समतेचा उपदेश केला. संत तुकारामांच्या अभंगगाथेतील अभंग आजही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात गायले जातात. त्यांचे निर्वाण १९ मार्च १६५० रोजी झाले.

समर्थ रामदास

संतांची कामगिरी या पाठातील पुढील संत आहेत समर्थ रामदास. संत रामदासांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर आहे. त्यांचा जन्म 24 मार्च 1608 मध्ये जांब या जालना जिल्ह्यातील गावांमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत व आईचे नाव राणूबाई होते.

रामदासांनी आपल्या दासबोध या ग्रंथातून लोकांना मोलाचा उपदेश केला. मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सदविचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. बलोपासणीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. संत रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची शिकवण दिली.

अशाप्रकारे संतांची कामगिरी या पाठांमध्ये आपल्याला संत चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या विषयी माहिती दिली आहे. संतांची कामगिरी पाठावर आधारित स्वाध्याय व त्यांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत.

संतांची कामगिरी स्वाध्याय

१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

( अ ) संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.

( आ ) ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.

( इ ) संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.

( ई ) समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली.

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

( अ ) श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते ?

श्रीचक्रधर स्वामींना स्त्री-पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.

( आ ) संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला ?

धर्म रक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार संत नामदेवांनी लोकांच्या मनात निर्माण केला.

(इ) संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला ?

कोणताही उच्चनीच भेदभाव मानू नका, प्राणीमात्रांवर दया करा असा उपदेश संत एकनाथांनी लोकांना केला.

(ई) समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला ?

‘ सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे ‘ , हा समर्थ रामदासांनी संदेश दिला.

३. संतांची कामगिरी पाठाच्या सहाय्याने दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

( अ ) संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले ?

ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले ; पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले.

( आ ) संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला ?

संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उद्देश करत – ‘ जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | तोचि साधु ओळखावा | देव तेथेचि जाणावा |’ हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.

संतांची कामगिरी या पाठावर आधारित आणखी काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.

Leave a Comment