1 ते 100 मधील मूळ संख्या (Prime Number) आणि संयुक्त संख्या हा गणित विषयातील खूप महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर आधारित निरनिराळे प्रश्न शालेय अभ्यासक्रमापासून ते निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा पर्यंत विचारले जातात. अगदी पहिली दुसरीपासून होणाऱ्या स्पर्धा परीक्षा बरोबरच पाचवी स्कॉलरशिप परीक्षा, आठवी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, NMMS परीक्षा, महा टीईटी परीक्षा, त्याचबरोबर एमपीएससी यूपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या निराळ्या परीक्षा मध्ये ज्या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. या पोस्टमध्ये आपण या घटकावर आधारित सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मूळ संख्या (Prime Number) म्हणजे काय?
ज्या संख्येला 1 किंवा ती स्वतः संख्या या शिवाय कोणत्याही दुसऱ्या संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्याला मूळ संख्या म्हणतात.
म्हणजेच मूळ संख्या 1 आणि स्वतःच्या पाढ्यात असते इतर कोणत्याही संख्येच्या पाढ्यात नसते. मूळ संख्यांना एक आणि ती स्वतः असे दोनच विभाजक असतात.
उदाहरणार्थ 7,19 या संख्यांना फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. म्हणजेच 7 फक्त 1 ने विभाज्य आहे आणि 7 ने विभाज्य आहे इतर कोणत्याही संख्येने त्याला भाग जात नाही. त्याचप्रमाणे 19 या संख्येला सुद्धा फक्त एक आणि 19 या दोन संख्यांनी भाग जातो म्हणजेच हे दोनच विभाजक आहेत म्हणून या दोन मूळ संख्या आहेत. आता 1 ते 100 मधील मूळ संख्या अभ्यासू.
1 ते 100 मधील मूळ संख्या
एक ते शंभर मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. या सर्व मूळ संख्यांचा गटनिहाय अभ्यास आपण पाहणार आहोत.
संख्यांचा गट | मूळ संख्या | एकूण मूळ संख्या |
1 ते 10 मधील मूळ संख्या | 2, 3, 5, 7 | 4 |
11 ते 20 मधील मूळ संख्या | 11, 13, 17, 19 | 4 |
21 ते 30 मधील मूळ संख्या | 23, 29 | 2 |
31 ते 40 मधील मूळ संख्या | 31, 37 | 2 |
41 ते 50 मधील मूळ संख्या | 41, 43, 47 | 3 |
51 ते 60 मधील मूळ संख्या | 53, 59 | 2 |
61 ते 70 मधील मूळ संख्या | 61, 67 | 2 |
71 ते 80 मधील मूळ संख्या | 71, 73, 79 | 3 |
81 ते 90 मधील मूळ संख्या | 83, 89 | 2 |
91 ते 100 मधील मूळ संख्या | 97 | 1 |
मूळ संख्येबाबत महत्त्वाची माहिती
- एक ते शंभर मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत.
- 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या तर 51 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत.
- सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. एक ते शंभर मधील सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे.
- 25 मूळ संख्या पैकी 2 ही एकमेव मूळ संख्या सम आहे उर्वरित 24 मूळ संख्या या विषम आहेत.
- मूळ संख्या गटनिहाय लक्षात ठेवण्यासाठी चाचा दोदोती दोदोती दोए ही युक्ती वापरू शकता. याचा अर्थ आहे पहिल्या गटात चार, दुसऱ्या गटात चार मूळ संख्या, तिसऱ्या व चौथ्या गटात प्रत्येकी दोन मूळ संख्या, पाचव्या गटात तीन मूळ संख्या, सहाव्या व सातव्या गटात प्रत्येकी दोन मूळ संख्या, आठव्या गटात तीन मूळ संख्या, नवव्या गटात दोन मूळ संख्या व दहाव्या गटात एक मूळ संख्या आहेत.
- मूळ संख्यांना 1 व ती स्वतः असे दोनच अवयव असतात.
- एक अंकी एकूण 4 मूळ संख्या आहेत तर दोन अंकी एकूण 21 मूळ संख्या आहेत.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध
1 ही मूळ आहे की संयुक्त आहे?
कोणतीही संख्या मूळ होण्यासाठी त्या संख्येला फक्त दोनच अवयव असावे लागतात. मूळ संख्येला एक आणि ती स्वतः असे एकूण दोन अवयव असतात. म्हणजेच ज्या संख्येला एक आणि ती स्वतः असे दोनच अवयव असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.
1 ते 100 मधील मूळ संख्या मध्ये 1 या संख्येला फक्त एक अवयव असल्याने ती मूळ संख्या होत नाही.
ज्या संख्येला तीन किंवा तीन पेक्षा जास्त अवयव असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. या नियमानुसार संयुक्त संख्येला तीन किंवा त्यापेक्षा जास्त अवयव असणे आवश्यक असते. एकला मात्र फक्त एकच अवयव असल्याने 1 ही संख्या संयुक्त ही ठरत नाही.
म्हणजेच 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही.
मूळ संख्या या घटकावर आधारित प्रश्न विचारले जाणारे घटक
- गटात न बसणारी संख्या ओळखा.
- गटाशी जुळणारे पद ओळखा.
- एक ते वीस मध्ये असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
- 41 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज किती?
- क्रमाने येणारी पुढील संख्या ओळखा.
- एक ते शंभर मधील एकूण मूळ संख्या
- मूळ संख्या वर आधारित आकृतीबंध पूर्ण करा.
या ठिकाणी 1 ते 100 मधील मूळ संख्या विषयी माहिती अभ्यासण्यात आली आहे.