Skip to content

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज| Rashtrasanta tukadojimaharaj swadhay 5 vi

  • by
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

संत तुकडोजी महाराज भाषण

महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी मानली जाते. अनेक थोर संतांनी महाराष्ट्राच्या या भूमी मध्ये जन्म घेतला आहे. त्यातीलच एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे होते. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव मंजुळाबाई होते व वडिलांचे नाव बंडोजी इंगळे होते.

देशातील अंधश्रद्धा आणि जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेमध्ये काव्यरचना केली आहे. ग्रामगीता, अनुभव सागर, सेवा स्वधर्म इत्यादी साहित्य रचना त्यांनी केली आहे.

तुकडोजी महाराजांना आधुनिक काळातील महान संत मानले जाते. संत तुकडोजी महाराजांनी प्रबोधनासाठी महाराष्ट्र नव्हे तर देशभर प्रवास केला. एवढेच नव्हे तर जपान सारख्या देशात जाऊनही त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला होता.

तुकडोजी महाराजांच्या तत्त्वज्ञानामध्ये एकेश्वर वादाला खूप महत्त्व होते. विश्वाचा निर्माता एकच आहे असे त्यांचे म्हणणे होते. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी विरोध केला.

समाज प्रबोधनांमध्ये महिलांच्या प्रगतीला अन्यसाधारण महत्त्व आहे. हे ओळखून त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये महिलांच्या प्रगतीबाबतही विचार मांडले होते. आपली संपूर्ण कुटुंब व्यवस्था व समाजव्यवस्था स्त्रीवर अवलंबून असते त्यामुळे समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान मिळणे खूप आवश्यक आहे. हे लोकांना त्यांनी पटवून दिले. स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे अशा प्रकारचे विचार संत तुकडोजी महाराजांचे होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अमरावती जवळ मोझरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती. ग्रामगीता हा त्यांचा गावाच्या विकासावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ आहे.

अशा या महान संतांचा मृत्यू 31 ऑक्टोबर 1968 रोजी मोझरी जिल्हा अमरावती येथे झाला. अशा या महान संतांना कोटी कोटी प्रणाम.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

इयत्ता – पाचवी.

विषय – मराठी.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

संत तुकडोजी महाराजांची माहिती देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा पाठ इयत्ता पाचवीच्या पुस्तकांमध्ये. या पाठावरील प्रश्न व त्यांच्या उत्तराबाबत आपण माहिती पाहणार आहोत.

प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? 

शिकारीला गेलेल्या राजाने ‘ यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही,’ अशी शपथ घेतली.

२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू व मराठी भाषांतील स्वतः रचलेली कवने बेभान होऊन गात असत.

३) संत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

 तुकडोजी महाराज यांनी ‘ ग्रामगीता ‘ हा ग्रंथ लिहिला.

प्र २) का ते लिहा.

१) राजाने शिकार करण्याचे सोडले ?

तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली; म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले.

२) चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना   ‘देवबाबा ‘ म्हणत.

तुकडोजी महाराज स्वतःची कवने बेभान होऊन अशी गात असत की लोक तासानतास तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या या वेगळे गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना ‘ देवबाबा ‘ म्हणत.

३) राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा  ‘ राष्ट्रसंत ‘ पदवीने गौरव केला.

तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या. तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले, म्हणून राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांचा ‘  राष्ट्रसंत ‘ पदवीने गौरव केला.

प्र ३) तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

१) श्री गुरुदेव सेवामंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले?

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वतंत्र भारतात विविध संस्थांने विलीन करण्याचे कार्य महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने भरीव कार्य केले. या सेवा मंडळांनी हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला.

गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी स्वच्छता, यात्रा शुद्धी, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन, असे अनेक उपक्रम राबवले. सामुदायिक सहभोजनात सर्वांना सामील करून धर्म, जात – पंथातील विषमता कमी केली.

२) साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले ? 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळत नव्हता. तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले.

३) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले ?

जपानमध्ये ‘ विश्वशांती परिषद ‘  व   ‘जागतिक धर्मपरिषद ‘ आयोजित करण्यात आली होती. या परिषदांचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्त्वांची माहिती सांगितली. तेथे अठरा देशांची जागतिक धर्म संघटना गठित करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले.

इयत्ता पाचवी मराठी विषयाचे स्वाध्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *