पुस्तके स्वाध्याय
प्र १) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात, असे कवितेत म्हटले आहे ?
पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके माणसांच्या, जगाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके जिंकल्याच्या, हरल्याच्या एकेक क्षणाच्या गोष्टी सांगतात. तसेच, प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात. विश्वाच्या ज्ञानाचे भांडार असलेली पुस्तके कधी परीकथेतील कल्पना, तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात.
२) पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात ?
पुस्तके आपल्याला पुराणकाळापासून विज्ञान – तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहेत. विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकांत असतो. या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात, मुलांनी पुस्तकांत रममाण व्हावे, यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात.
३) आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे, असे कवींना का वाटते ?
पुस्तकांत पाखरे किलबिलतात, अक्षरे सळसळतात,झरे गुणगुणतात. पुस्तकांत जशा पऱ्यांच्या अजब कथा आहेत, तसे रॉकेटचे तंत्र व विज्ञानाचा मंत्रही आहे. पुस्तकांची दुनिया निराळी आहे व त्यात ज्ञानाची उंच भरारी आहे. म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे, असे कवी म्हणतात.
प्र २) ‘ पुस्तके ‘ या कवितेतील पुढील गोष्टी काय करतात ते लिहा.
उदा . पाखरं – चिवचिवतात.
१) आखरं – सळसळतात.
२) निर्झर – गुणगुणतात.
प्र ३) पुस्तक तुमच्याशी बोलते आहे, अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्ये लिहा.
मुलांनो, मी पुस्तक बोलत आहे. मला तुम्हाला काही सांगायचे आहे. माझ्याकडे माहितीचा व ज्ञानाचा खजिना आहे. तो तुम्ही मनसोक्त लुटा. साऱ्या जगाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत. तुम्हांला निसर्ग जाणून घ्यायचा आहे? तर मग मला वाचा !
नवीन गोष्टी शिकायचे आहेत त्यासुद्धा तुम्ही माझ्याकडून शिका. जगातल्या कोणत्याही गोष्टीबाबतचे ज्ञान माझ्या मध्ये साठवून ठेवले आहे. आनंदात सुखात दुःखात नेहमीच मी तुमच्यासोबत राहतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर माझा उपयोग करा. माझ्याजवळच ज्ञान मी निस्वार्थीपणे आपणा सर्वांना समान देतो.